देवाधिदेव महादेवांची सुद्धा अनंत नावे आहेत आणि प्रत्येक नावामागे एखाद्या भक्ताच्या भक्तीची कथा असते अशीच कथा कोडीत गावातील कोटेश्वर महादेवांची पण आहे.
खूप खूप वर्षांपूर्वी महादेवांचा एक निस्सीम असा भक्त होता तो महादेवांची जन्मापासून शुध्द अंतःकरणाने महादेवांची भक्ती करत असे.पण कालांतराने त्याला कोड या महारोगाने ग्रासले आणि त्यामुळे समाजाने त्याला वाळीत टाकले आणि पुजाऱ्यांनी त्याला मंदिरात येण्यास मज्जाव केला.पण त्याची निष्ठा अटळ होती व तो कोटेश्वर कुंडात पहाटे स्नान करून पुजा करू लागला अतिशय थंड पाण्यात सर्व वेदना सहन करून तो शिवपंचाक्षर मंत्राचा जप करत असे.एक दिवस पुजाऱ्यांनी त्यास धमकी दिली की त्याने पुन्हा पुजा केली तर त्याला प्राण गमवावे लागतील.
आणि एक दिवस पुजाऱ्यांनी त्यास पुजा करताना पकडले व त्याला मारु लागले आधीच रोगामुळे व क्षुधेमुळे तो शक्तिहीन झाला होता त्याने पूर्ण श्रद्धेने महादेवांचा धावा केला. "हे शंभो,महादेव,शिवशंकरा धावा प्रभू मला मुक्त करा.हे प्रभू वैद्यनाथा मला या रोगातून मुक्त करा कोडेश्वरा"असा तीव्र धावा ऐकून महादेव प्रकट झाले.व त्याला कोड या रोगातून मुक्त केले.
तेव्हापासून महादेवास "कोडेश्वर"हे नाव प्राप्त झाले व कालांतराने त्याच नावाचा अपभ्रंश होऊन "कोटेश्वर"झाले.
पण कालांतराने लोकांना या कथेचा विसर पडला पण तरीही आजही काही लोक रोगमुक्तीसाठी महादेवांची पूजा करतात.
























